अन् खरचं तुझी आठवण येते ....

कधी सागराचे किनारे
वाळूत रूतलेले पाय
फक्त माझ्याच पायाचे ठसे
अन् तुझी आठवण येते

कधी मुसळधार पाऊस
डोक्यावर छत्री
आणि छत्रीत मी एकटाच
अन् तुझी आठवण येते

कधी मदहोश रात्र
आकाशात पुर्ण चंद्र
रातराणीचा सुगंध
अन् तुझी आठवण येते 

कधी माझी कविता
तिचा उडालेला रंग
माझा बदललेला ढंग
अन् तुझी आठवण येते

कधी नीरव शांतता 
कानात तुझा आवाज
डोळ्यासमोर तुझी प्रतिमा
गालावर सुखलेले अश्रु
अन् खरचं तुझी आठवण येते ....

-प्रतिक देसाई.

मना रे मना

मना रे मना किती विचार करशील?
जुन्या आठवणींना किती रे गोंजारशील?
त्या एकाच दुःखाने किती खिन्न होशील?
भुतकाळ होता तो हे कधी समजशील?

सगळे विसरणे असे लगेच शक्य नसते
ठावूक आहे मजला
मात्र भुतकाळात हरवणे ही योग्य नसते
हे कसे समजावू तुजला?

स्वप्न पाहणे हा गुन्हा नाही आहे
माहीत आहे मजला....
मात्र स्वप्नेही तुटतात कधी
हे ठाव आहे का तुजला?

जिंकणे हरणे हेच खरे जीवन
आहे रे मना....
आणि त्यातच सुख शोधणे हेच जगणे
आहे रे मना....

- प्रतिक देसाई.