ते दिस हरवले !

कधी सरकले, कधी सरले
काहीच न उमगले
दुनियेच्या या समरात
बालपणीचे सोनेरी दिस हरवले
गोट्या क्रिकेटचे ते दिस
मैदानाच्या धुळीत विरले
चिक्कू, पेरू झाडावरील आंबे
पाला पाचोळ्यात विखुरले
गोळ्या चोकोलेट ते चिकट हात
कुठे आठवणीत दडले
खोपरा गुडग्यावरच्या जखमांचे
व्रण आठवण म्हणून राहिले
एक रुपयाचा तो पेप्सीकोला
पैशाची किंमत शिकवूनी गेला
झाडाखालचा तो हलता झोपला
हलत जग दाखवुनी गेला
लपा-छपी सुखदुखाची
लपंडावानेच शिकवला
संसाराच्या गड्याच्या चाकांचा 
अंदाज भातुकलीतच दिसला 
फटक्याच्या त्या धुरात
क्षण भंगुर आनंद कळले
दगडमातीच्या त्या किल्ल्याने
अभेद्यापणा दर्शवले
कोलमडलेल्या पत्त्याच्या घराने
मोडणारी स्वप्ने दाखवली
जीवनातील चढ उतार
सापशिडीनेच शिकवली
आईच्या त्या माराने
बरे वाईट उमगले
बाबांच्या प्रेमळ शब्दांनी
मनावर ठसे उमटवले
बालपणीचे ते दिस
दुनियादारी सांगुनी गेले
न समजले काही, न गवसले
ते दिस कुठे हरवूनी गेले
                              - प्रतिक देसाई      

No comments: